मुलीच्या विवाहातील आहेर मनोबल केंद्रास भेट ! ( व्हिडीओ )

aadarsh vivah

जळगाव प्रतिनिधी । विवाहातील बडेजावावर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण होत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर होत असतांना येथील औषधी व्यावसायिक अभय खांदे यांनी आपल्या कन्येच्या विवाहातील आहेराला दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल केंद्राला भेट देऊन नवीन आदर्श दाखवून दिला आहे.

सध्या विवाह सोहळ्यांवर प्रचंड प्रमाणात खर्च होत असतो. लग्न हा प्रतिष्ठेचा प्रश्‍न असल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. मात्र याला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. याच प्रमाणे येथील शिवालीक मेडिकलचे संचालक अभय खांदे व सरोज खांदे यांनी आपल्या कन्येच्या विवाहात सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. खांदे दाम्पत्याची कन्या चि.सौ.कां. कल्याणी हिचा विवाह नुकताच ठाणे येथील प्रतिभा व सुभाष वैद्य यांचे पुत्र चि. योगेश यांच्यासोबत पार पडला. या विवाहाचा स्वागत समारंभ शनिवार दिनांक २२ रोजी आयोजित करण्यात आला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यात रोख आहेराच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम ही दीपस्तंभ फाऊंडेशन संचलीत करत असलेल्या मनोबल केंद्रास भेट देण्यात येणार आहे. यात वर-वधू आणि वधू आणि त्यांचे माता-पिता हे त्यांच्याकडून अजून रक्कम टाकणार आहेत हे विशेष.

दीपस्तंभच्या मनोबल केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनींचा उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येते. यातून त्यांना आत्मविश्‍वासाने परिपूर्ण असे जीवन जगण्याची संधी प्रदान करण्यात येते. दीपस्तंभचे हे मानवतावादी काम पाहून आपण विवाहातील आहेर मनोबल केंद्रास देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तर वर-वधूंनीही सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. खांदे कुटुंबाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

पहा : सामाजिक बांधिलकी जपणार्‍या खांदे कुटुंबाबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

Protected Content