
अमळनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खोकरपाठ येथील ‘शंभू महिला शेतकरी गट’ यांच्या शाश्वत शेती, जल व मृदा संधारण आणि गटव्यवसायांच्या आदर्श उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील ११ गावांतील शेकडो महिला शेतकऱ्यांनी अभ्यासभेट दिली. या भेटीद्वारे ग्रामीण महिलांनी गटशेतीचे फायदे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि जलसंधारणाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले.
ही अभ्यासभेट राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून IWMP (Integrated Watershed Management Programme) योजनेच्या कार्यक्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आली होती. भिलाली, एकतास, एकलहरे, पाडसे, तांदळी, शहापूर, खेडी, खर्दे, वासरे, निंब आणि कळमसरे या गावांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने या अभ्यासभेटीत सहभागी झाल्या.
खोकरपाठ येथील ‘शंभू महिला शेतकरी गट’ गेल्या दोन वर्षांपासून विषमुक्त कापूस आणि मका उत्पादनासाठी नैसर्गिक कीडनियंत्रण तंत्राचा (Natural Pest Management) यशस्वी वापर करत आहे. या गटाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, गांडूळखत निर्मिती, कृषी अवजार भाडेतत्त्वावर देणे, टोकण यंत्र वापर, वृक्षारोपण आणि जल-मृदा संवर्धन यांसारखे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
अभ्यासभेटीदरम्यान गटातील संगीता पाटील, रेखा पाटील आणि सुलभा पाटील यांनी उपस्थित महिलांना गटशेतीची रचना, पाणी फाउंडेशनच्या सहाय्याने राबवलेल्या प्रकल्पांची माहिती तसेच शाश्वत शेती तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी प्रत्यक्ष शेतावर दाखले देत सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपिकता वाढते, उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते हे सांगितले.
या भेटीद्वारे सहभागी महिलांना शाश्वत शेती, गटशेतीची एकजूट आणि जल-मृदा संवर्धनाचे वास्तव अनुभव मिळाले. अनेक महिलांनी ‘शंभू महिला शेतकरी गट’च्या कार्याचे कौतुक करत आपल्या गावातही अशीच गटशेती आणि सेंद्रिय शेती सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.



