
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान झूलेलालांविषयी छत्तीसगड येथील जोहार पार्टीचे प्रमुख अमित बघेल यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र संताप जळगावात उसळला आहे. शहरातील सिंधी समाज बांधवांनी या वक्तव्याचा निषेध करत आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत समाज बांधवांनी शहरातील दुकाने बंद ठेवत रोष व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित बघेल यांच्या छायाचित्राला काळा फासून आणि जोडे-चपला मारत निषेध नोंदविण्यात आला. संतप्त नागरिकांनी अमित बघेल यांचा पुतळा जाळत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनादरम्यान ‘भगवान झूलेलालांचा अपमान सहन केला जाणार नाही’, ‘अमित बघेल माफी मागा’ अशा घोषणा दिल्या गेल्या.
सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या निदर्शनात सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लक्षणीय म्हणजे, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील सहभागी झाला होता. पक्षाच्या प्रतिनिधींनी सिंधी समाजाच्या भूमिकेला समर्थन देत धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेमुळे जळगाव शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. सिंधी समाज बांधवांनी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



