‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात सुरु असलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी तब्बल पाच हजार नागरिकांनी भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू या प्रदर्शनामागे आहे, असे ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सरवर यांनी सांगितले.

या प्रदर्शनात नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक तसेच आकर्षक प्रदर्शन सामग्री पाहावयास मिळत आहे. विशेषतः भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (Geological Survey of India) आपल्या स्टॉलवर ठेवलेले एक लाख वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अंडे पाहून जळगावकर थक्क झाले. विद्यार्थी वर्गाने तर ते मोठ्या कुतूहलाने पाहिले आणि प्रत्यक्ष इतिहासाचा अनुभव घेतल्याची भावना व्यक्त केली. भूवैज्ञानिक लोटन सूर्यवंशी यांनी या अवशेषाविषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावच्या स्टॉलनेही प्रदर्शनात विशेष लक्ष वेधून घेतले. येथे युद्धात वापरल्या जाणाऱ्या देशी बनावटीच्या बॉम्ब, बुलेट्स आणि विविध म्युनिशन्सच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रतिकृती पाहून नागरिकांना प्रत्यक्ष युद्धभूमीचा थरार अनुभवता आला. देशी तंत्रज्ञानावर आधारित या म्युनिशन्समुळे भारताची संरक्षणक्षमता किती सक्षम आहे, याची झलक येथे दिसून आली.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आयुध निर्माण वरणगावचे ज्युनियर वर्क मॅनेजर अमोल पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर देवेंद्र विसपुते आणि दिनेश नाईकनवरे उपस्थित होते. त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी संवाद साधताना सांगितले की, अशा प्रदर्शनांमुळे तरुण पिढीला विज्ञान, संरक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संधींची जाणीव होते, हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे.

‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ हे प्रदर्शन नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत नव्या महाराष्ट्राच्या दिशेने प्रेरित करणारे ठरत आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.