
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन बाजारतळ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकताच शेतजमीन भाडेतत्वावर घेण्याचा करारनामा नोंदविण्यात आला असून, मंजुरी मिळताच या ठिकाणी शेतमालाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे यांनी दिली.
दहिगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी योग्य बाजारपेठ मिळावी, तसेच खेडा खरेदीतील फसवणुकीस आळा बसावा, या उद्देशाने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मौजे दहिगाव शिवारातील गट क्र. २१८ क्षेत्र हे. १.२९.०० इतकी शेतजमीन पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. या व्यवहाराचा करारनामा विधिवत नोंदविण्यात आला आहे.
बाजारतळ स्थापनेसाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शेतमाल लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही सभापती फेगडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या परिसरातच शेतमाल विक्री करण्याची सोय उपलब्ध होईल, तसेच त्यांना बाजारभावात पारदर्शकता मिळण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर प्रतिसाद मिळाल्यामुळे दहिगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून स्वागत होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराचे कौतुक केले जात आहे.



