टोकरे कोळी आदिवासी जमातीचे भुसावळात बेमुदत आमरण उपोषण सुरू!


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे टोकरे कोळी आदिवासी जमातीतर्फे जातीय प्रमाणपत्रांच्या संदर्भात सुरू असलेला अन्याय आणि दुर्लक्षाविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला शिवसेना (शिंदे गट) तर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालून मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा जमातीने दिला आहे.

टोकरे कोळी समाजाने अनेक वेळा शासनाकडे जातीच्या दाखल्यांच्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा केला, मात्र वारंवार या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप समाज नेत्यांनी केला आहे. याच निषेधार्थ भुसावळ येथील प्रांत कार्यालया समोर समाज बांधवांनी एकजूट दाखवत आमरण उपोषण सुरू केले आहे. शासन प्रतिनिधींनी या आंदोलनाची नोंद घेतली असली तरी अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संतापाचे वातावरण आहे.

या उपोषणाला शिवसेना (शिंदे गट) तर्फे अधिकृत पाठींबा मिळाल्याने आंदोलनाला राजकीय बळ प्राप्त झाले आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर हा प्रश्न जोरदारपणे मांडण्यात येईल, असा इशारा पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकून समाजाच्या प्रभागात खासदार आणि मंत्र्यांना फिरकू दिले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे टोकरे कोळी समाजाच्या असंतोषाचा ज्वालामुखी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शासनाने योग्य निर्णय घेऊन समाजाचा विश्वास परत मिळवावा, हीच या उपोषणाची मागणी आहे.