राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेवरून तापले वातावरण !

औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र, या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शवला आहे.  यामुळे सभा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमच दिला आहे. 3 मे पर्यंत जर भोंग्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचं म्हटलं. त्यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. पण या सभेला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

शहरातील एकता आणि शांती भंग होऊ शकते असं सांगत राज ठाकरेंच्या सभेला कडाडून विरोध होताना दिसत आहे. आता या संदर्भात औरंगाबाद पोलीस काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. सभेला परवानगी मिळणार की नाही हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Protected Content