सावधान : देशात पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू होती. आता अचाकन रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. मागील २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांत तब्बल ६५.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीत याबाबत काय चर्चा होते का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. या निर्णयाला 20 दिवस उलटत नाहीत तोवर आता केंद्राने पुन्हा एकदा अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले असून, ही कोरोनाची चौथी लाट असल्याचा धोका व्यक्त होत आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,067 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये 65.7 टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 522,006 झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण 1,86,90,56,607 लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 17,23,733 कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 12,340 आहे. गेल्या 24 तासांत 1547 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 42513248 झाली आहे. मंगळवारी 1,247 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

केंद्र सरकारने हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मिझोरामला कोविड -19 च्या सकारात्मकतेचा दर आणि सतत वाढत असलेल्या प्रकरणांबद्दल सतर्क केलं आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

Protected Content