दिल्लीच्या जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. आजपासून पोलिसांनी दंगलग्रस्त जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली असून येथील अनधिकृत बांधकामांवर  बुलडोझर फिरवला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी 25 आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे.

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसंच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती. या हिंसाचारत आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत.

दरम्यान पालिकेने दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई सुरु केली आहे. दिल्लीच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दंगलीतील आरोपींनी जहांगीरपुरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं उभी केल्याचा दावा करत यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली असून बुल्डोझरच्या सहाय्याने अनधिकृत दुकानं, घरं तोडली जात आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस तैनात करण्याची मागणी पालिकेने केली आहे.

Protected Content