जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत गुरुवारी, १९ जून रोजी महिला कर्मचाऱ्यांसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन खासदार मा. स्मिता वाघ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एका महिलेचे दुःख दुसरी महिलाच समजू शकते: खासदार स्मिता वाघ
उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, “एका महिलेचे दुःख दुसरी महिलाच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सुसज्ज हिरकणी कक्षाची निर्मिती करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा योग्य उपयोग करावा.” त्यांनी या कक्षाच्या निर्मितीबद्दल सीईओ करनवाल यांचे कौतुक केले.
ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांनाही सुविधेचा लाभ
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल म्हणाल्या की, “हिरकणी कक्ष ही सुविधा केवळ जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. सर्व महिलांनी ही सुविधा निर्भीडपणे व आत्मविश्वासाने वापरावी.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले.
महिला हक्कांबद्दल प्रशासनाची संवेदनशीलता
या कार्यक्रमादरम्यान, महिलांच्या हक्कांची जाणीव आणि त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून ‘हिरकणी कक्ष’ उभा राहत असल्याचे सर्वच स्तरातून मान्य करण्यात आले. हा कक्ष महिलांना दिलासा देणारा आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित व आरामदायक वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे.