आसाममध्ये भाजपने बदलले मुख्यमंत्री; शर्मा यांना संधी !

गुवाहाटी । भाजपने सर्बानंद सोनोवाल यांच्या ऐवजी हेमंत बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असून ते लवकरच शपथविधी घेणार आहेत.

आज सकाळी 11 वाजता दिसपूर येथे भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बीएल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. सर्बानंद यांनी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, आज दुपारी शर्मा हे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. येत्या दोन दिवसात सरमा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री आणि भाजपाचे नेते नरेंद्रसिंह तौमर, आसामचे पक्ष निरीक्षक अरूण सिंह हे उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची निवड करण्यात आल्यानंतर आता सर्वानंद सोनोवाल यांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोनोवाल यांना पुन्हा दिल्लीत बोलवलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आसामचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी सोनोवाल हे केंद्रात मंत्री होते.

Protected Content