रावेर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीचा हाहाकार : निसर्गाच्या फटक्यामुळे जबर हानी

रावेर-शालीक महाजन | काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या कटू आठवणी संपत नाही तोच आज पुन्हा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका पडला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यात पुरामध्ये एक चारचाकी वाहन वाहून गेले असून यातील चौघे जण सुदैवाने बचावले आहेत. तर रावेरसह तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्याला ५ जुलै रोजी रात्री अतिवृष्टीचा फटका बसला होता. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर यामुळे शेतीसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर दोन आठवड्यांनी आज अर्थात बुधवार दिनांक १९ जुलै रोजी तालुक्याला पुन्हा पावसाने झोडपून काढले आहे.

आज पहाटेपासूनच रावेर शहरासह तालुक्यात रिपरीप पाऊस सुरू होता. दुपारी पावसाची तीव्रता वाढली. यामुळे शहरासह तालुक्यातील विविध गावे अक्षरश: जलमय झाली. शहराचा विचार केला असता नागझिरी येथील पुलावरून धोक्याच्या पातळीच्या वरून पाणी वाहत आहे. येथून वाहतूक बंद करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरातील सुमारे ३० ते ३५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून यामुळे नागरिकांचे नुकसान झालेले आहे.

हे देखील वाचा : रावेर तालुक्यात दोन जण गेले वाहून

दरम्यान, ग्रामीण भागाला देखील पुराचा मोठा फटका बसला आहे. रावेर ते अजंदा, रावेर ते रमजीपूर, रावेर ते कुंभारखेडा, कुंभारखेडा ते खिरोदा, शिंदखेडा ते रावेर या गावांमधील संपर्क तुटला आहे. तसेच विवर्‍यासह अन्य गावांमध्येही जोरदार अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. रावेरसह तालुक्यातील विविध गावांमध्ये सुमारे २०० घरे आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले असून यामुळे त्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे.

या पावसामुळे शेत-शिवारालाही मोठा फटका बसला आहे. आधीच्या अतिवृष्टीमुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते. आजच्या पावसामुळे देखील केळीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच जेेरीस आला असतांना मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांची यामुळे मोठी हानी झालेली आहे. यात निंभोरा परिसरातील केळी उत्पादकांची देखील मोठी हानी झालेली आहे. सरकारने केळी उत्पादकांना तातडीने मदत करण्याची मागणी आता होत आहे.

दरम्यान, रावेर शहराकडून अजंदा येथे मारूती वॅगनार कंपनीची चारचाकी गाडी पुरात वाहून गेली आहे. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यांना वाहन वाहण्याच्या स्थितीत असल्याचे जाणवताच त्यांनी बाहेर उड्या मारल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. तर ही वॅगनार पुराच्या पाण्यात वाहून गेली. आज अतिवृष्टीमुळे शिवारातील शेतांमध्ये पाणी वाहू लागले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content