यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव आणि परिसरात आज (१६ मे) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे गावात सुरू असलेल्या अनेक लग्न समारंभांमध्ये वऱ्हाडी मंडळी आणि लग्न आयोजकांची चांगलीच धावपळ झाली. तर दुसरीकडे, शेतात तयार मालाची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
लगीनघाईत पावसाचा व्यत्यय, वऱ्हाडींची धावपळ
आज सकाळपासूनच दहिगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण होते आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. गावात जवळपास दहा ते बारा लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे लग्न आयोजकांची आणि वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली.
त्याचबरोबर, सध्या परिसरात भुईमुगाची काढणी सुरू आहे. शेतात काम करणारे मजूर असताना अचानक पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या काढलेल्या शेंगा भिजल्या. वाळत घातलेला मका ओला झाला, तर कोरडा चाराही ओलाचिंब झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भुईमुग आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान
परिसरातील मोहराळा, कोरपावली, हरिपुरा, सावखेडासिम आणि दहिगाव या भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. सुदैवाने, वादळ आले नाही, अन्यथा शेतकऱ्यांचे आणखी मोठे नुकसान झाले असते. या अचानक आलेल्या पावसामुळे लग्नातील आनंदावर आणि शेतकऱ्यांच्या कामावर पाणी फिरले आहे.