Home Cities जळगाव ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी रंगभूमीवर अनेक कलाकार घडविणारे, बालनाट्य चळवळीला नवे आयाम देणारे आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनावर संस्कार करणारे ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित शोकसभेत गायकवाड यांच्या कलाक्षेत्रातील अविस्मरणीय योगदानाला उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना भावपूर्ण अभिवादन केले.

या श्रद्धांजली सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ज्या व. वा. वाचनालयातील रामनारायण सभागृहात ज्ञानेश्वर गायकवाड यांनी एका दिवसात एकाच बालनाट्याचे तब्बल दहा प्रयोग सादर करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता, त्याच सभागृहात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि जळगावशी असलेल्या अतूट नात्याचा गौरव करत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोकसभेसाठी पुणे येथून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सहचरिणी अंजली धारु, कन्या शर्वरी धारु तसेच संपदा जोशी विशेष उपस्थित होत्या. शोकसभेच्या समारोपावेळी अंजली धारु यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर गायकवाड आणि जळगाव शहरातील कलावंत, नाट्यप्रेमी व बालरंगभूमी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याला भावनिक शब्दांत उजाळा दिला. त्यांच्या आठवणींनी सभागृहातील वातावरण भारावून गेले.

श्रद्धांजली सभेदरम्यान बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश शर्मा, चिंतामण पाटील, प्रतिमा धर्माधिकारी याज्ञिक, राजेंद्र देशमुख, शंभू पाटील, पवन खंबायत, हर्षल पाटील तसेच नाशिक येथील रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कलासाधनेचा आणि नवोदित कलाकार घडविण्यातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांना रंगभूमीची प्रेरणा मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शोकसभेचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. या कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सभासद, शहरातील कलावंत, नाट्यरसिक तसेच ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मोठा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या रंगकर्मीला अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.


Protected Content

Play sound