


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी जळगाव येथील गुरु रविदास क्लबच्या वतीने रविवारी, 12 जुलै रोजी भव्य गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता जिल्हा पेठ येथील केमिस्ट भवनात होणाऱ्या या सोहळ्यात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, संशोधन तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महापौर दीपमाला काळे, माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार तसेच नगरसेविका सुरेखा नितीन तायडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी यशवंतराव ठोसरे राहणार असून, माजी प्राचार्य निळकंठराव गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सेवानिवृत्त मुख्य अभियंता डॉ. राजेंद्र बाविस्कर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी आणि समाजातील यशस्वी व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यंदाच्या गौरव समारंभासाठी जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी करण्यात आली आहे. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्र, विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नीट, जेईई, सीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव प्रदीप शेकोकार, प्रा. विठ्ठल सावकारे, धीमंत पी.आर. आंबेडकर, संजय बाविस्कर, प्रा. स्मिता जयकर यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



