विकासकामांच्या बळावर विजय निश्‍चीत-हरीभाऊ जावळे

haribhau jawale

यावल प्रतिनिधी । आपण आजवर केलेल्या कामांच्या शिदोरीवर रावेर-यावल मतदारसंघातील जनता पुन्हा कौल देणार असल्याचा आशवाद महायुतीचे उमेदवार ना. हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

रावेर-यावल मतदारसंघात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा राज्याच्या कृषी शिक्षण व विकास परिषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे हे जनतेला पुन्हा कौल मागत आहेत. आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांना लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष विस्तृत मुलाखतीमध्ये त्यांनी निवडणुकीबाबतची आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा सच्चा पाईक आणि कार्यकर्ता म्हणून मी राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली असून पक्षाने आजवर मला विविध पदांसाठी संधी दिली. आता या निवडणुकीतही मी जनतेचा कौल मागत आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असून आमच्या पक्षाने जनहिताची विविध कामे केली आहेत. याचमुळे केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र हे समीकरण विकासाला एकमेव पर्याय म्हणून समोर आलेले आहे. यामुळे मतदार भाजपला भरभरून मतदान करणार असल्याचा आशवाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यानंतर त्यांनी विविध स्थानिक मुद्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली.

ना. हरीभाऊ जावळे म्हणाले की, मी खासदार असतांना मांडलेली मेगा रिचार्ज ही योजना परिसरातील शेतकर्‍यांना नवसंजीवनी प्रदान करणारी असून ही मार्गी लागल्याची बाब समाधानकारक आहे. विरोधक याकडे टिका करत असल्याकडे लक्ष वेधले असता, ना. जावळे म्हणाले की, विरोधकांना आता बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. थेंब अमृताचा या योजनेत खोडा घालण्याचे काम करणार्‍यांपासून दुसरी काही अपेक्षादेखील नसल्याचा टोला त्यांनी मारला. यासोबत बहुप्रतिक्षित शेळगाव बंधार्‍याचे काम मार्गी लावल्याचे समाधान आपल्याला मिळत असल्याचे ते म्हणाले. यामुळे हजारो शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. तर टाकरखेडा येथील पुलामुळे यावल-रावेर तालुक्याची जळगावसोबतची कनेक्टीव्हिटी ही जलद होणार आहे. शेळगाव हा आपल्या या पंचवार्षीक योजनेतील महत्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

ना. हरीभाऊ जावळे पुढे म्हणाले की, रावेर-यावल मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. यात प्रामुख्याने आमोदा ते भिकनगाव या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. तर अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गाचे कामही मार्गी लागत आहे. मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांनी कात टाकली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आलेली आहेत. यासाठी कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. अलीकडेच खिरोदा येथे फलोत्पादन महाविद्यालय आणि हिंगोणा येथे टिश्यू कल्चर संशोधन केंद्राचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आपण स्वत: शेतकरी असल्यामुळे शेतकर्‍यांच्या वेदनांची जाणीव आहे. यामुळे अलीकडे केळीवर विषाणूंचा प्रादूर्भाव झाल्यानंतर यावर तातडीने उपायोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून सेव्ह बनाना ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे ना. जावळे म्हणाले.

आपल्या आजवरच्या कारकिर्दीत आपण भाजपच्या सब समाज को साथ लिये आगे है बढते जाना या ध्येयधोरणानुसार काम केले असून भविष्यातदेखील करत राहू. यामुळे यावल आणि रावेर मतदारसंघातील जनता आपल्याला मतदानाचा कौल देतील असा आशावाद ना. हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त केला.

Protected Content