हरीभाऊ जावळेंची निवड : अन्यायाचे उशीरा आणि अपूर्ण परिमार्जन

haribhau jawaleजळगाव प्रतिनिधी । आमदार हरीभाऊ जावळे यांना कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून पक्षाने त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन केले असले तरी यासाठी बराच उशीर झाला असून ते अपूर्णदेखील असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय वैमनस्यातून विरोधकांचा काटा काढण्याची कारस्थाने ही आपल्याला नवीन नाहीत. जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला असता अलीकडच्या काळात नाथाभाऊ विरूध्द सुरेशदादा हे उदाहरण या दृष्टीने समर्पक असे आहे. तथापि, अनेक नेत्यांना पक्षांतर्गत कारस्थानाचा फटका बसला आहे. याचे अलीकडेच सर्वात ज्वलंत उदाहरण हे माजी खासदार ए. टी. पाटील यांचे आहे. याच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षीय शह-काटशहाच्या राजकारणाचे बळी ठरलेले आमदार हरीभाऊ जावळे यांना कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी उरला असतांना आमदार जावळे यांना हे पद देण्यामागची अनेक कारणे आहेत. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला दुर करण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी या माध्यमातून प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीआधी महत्वाचे पद देऊन रावेर-यावलमधून हरीभाऊंनाच उमेदवारी मिळणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. यामुळे भाजपच्या तिकिटासाठी गुढग्याला बाशींग बांधून असणार्‍यांना हा जोरदार दणका आहे.

कोणतीही निवडणूक आल्यानंतर अमुक-तमुक नेत्याचे तिकिट कापले जाणार असल्याची आवई उठते. किंबहुना हा चर्वण करण्यासाठीचा सर्वात सोपा विषय आहे. मात्र कोणताही राजकीय पक्ष हा ‘इलेक्टीव्ह मेरीट’ तसेच वैचारिक व पक्षीय निष्ठा या दोन महत्वाच्या कसोट्यांवर तिकिट देत असतो. याचा विचार करता, अलीकडच्या काळात हरीभाऊ जावळे यांचे महत्व कमी करण्यासाठी पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे अनिल चौधरी यांचा पाठबळ देत असल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे जावळेंचे तिकिट कापून चौधरी हे भाजपचे उमेदवार राहतील अशा बाजारगप्पांना उत आला होता. या पार्श्‍वभूमिवर, हरीभाऊंना महत्वाचे पद देऊन पक्षाने योग्य तो संदेश दिला आहे.

एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपची हक्काची मतपेढी समजला जाणारा लेवा पाटीदार समाज हा पक्षापासून दूर जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामुळे भाजप श्रेष्ठींनी थोडे सबुरीचे धोरण स्वीकारले होते. मात्र आता खडसे यांना पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी हरीभाऊ जावळे यांना अचूक वेळ साधून महत्वाचे पद प्रदान करण्यात आले आहे. अर्थात, लेवा पाटीदार समाजासाठी आता भाजपने हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाला बळ दिले असल्याचेही या निवडीतून स्पष्ट झाले आहे. याहूनही महत्वाचा मुद्दा म्हणजे जळगावच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी अतिशय सावधपणे हालचाली करण्यास प्रारंभ केल्या आहेत. यात पक्षाने हरीभाऊ जावळे यांना महत्वाचे पद दिल्यामुळे ना. महाजन यांच्या वर्चस्वाची नव्याने द्वाही फिरवण्यात आलेली आहे. तथापि, या सर्व बाबींचा विचार करतांना आ. हरीभाऊ जावळे यांची झालेली कुचंबणा आणि न्याय मिळण्यासाठी लागलेला वेळ याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

गत दोन दशकांचा विचार केला असता, जिल्हा भाजपमध्ये दिवंगत डॉ. गुणवंतराव सरोदे आणि त्यानंतर हरीभाऊ जावळे यांच्यावर भयंकर अन्याय झाला. अवघ्या १३ महिन्यांसाठी लोकसभेस मुकलेल्या डॉ. सरोदेंना थेट विजनवासात पाठविण्यात आले. तर, हरीभाऊंचे जाहीर झालेले लोकसभेचे तिकिट पध्दतशीरपणे कापण्यात आले. फक्त एक विजय मिळवला असता तर या दोन्ही मान्यवरांना निश्‍चितच केंद्रीय मंत्रीपद मिळाले असते. मात्र ‘आपण म्हणू तीच पुर्व दिशा’ असा हेकेखोरपणा आणि जिल्ह्यात आपले वर्चस्व कमी होण्याच्या भयगंडातून तिकिटांची कापाकापी केल्याने सरोदे आणि जावळे यांना केंद्रीय पातळीवरील पदांना मुकावे लागले. तथापि, सात्विक विचार व साधन-शुचीता मानणार्‍या या दोन्ही मान्यवरांनी जाहीरपणे याबद्दल कधीही नाराजी व्यक्त केली नाही. दुर्दैवाने डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्याकडे पक्षाने साफ पाठ फिरवली तरी हरीभाऊ जावळे यांना उशीरा का होईना न्याय मिळाला असला तरी तो पुरेसा नाही. आमदार जावळे यांचा कृषीविषयीचा दांडगा अभ्यास असल्याबाबत कुणाचे दुमत नाही. संसदेत त्यांनी वेळोवेळी आपल्या या अभ्यासूवृत्तीचा प्रत्यय दिला आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी हरीभाऊंच्या या गुणाची जाहीर वाखाणणी केली आहे. यामुळे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा नव्हे तर हे मंत्रीपदच मिळाले असते तर त्यांच्या गुणांची खर्‍या अर्थाने कदर झाली असती. तथापि, पक्षाने दिलेली नियुक्ती ही मंत्रीपदाच्या मार्गावरील एक ठोस व आश्‍वासक पाऊल असल्याचे आपल्याला विसरता कामा नये.

आमदार हरीभाऊ जावळे यांना कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या माध्यमातून शेतकर्‍यांची खर्‍या अर्थाने सेवा करण्याची संधी आहे. याचे ते सोने करतील ही अपेक्षा आहे. अर्थात, याचसाठी त्यांना शुभेच्छा.

Protected Content