जी कारवाई करायची ती करा, मी इंदिरा गांधीची नात आहे ; प्रियांका गांधीनी योगी सरकारला सुनावलं

लखनौ (वृत्तसंस्था) माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी इंदिरा गांधीची नात आहे. मी सत्य बोलतच राहीन, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या विविध विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नोटीसांना ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे.

 

 

गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत आहे. तसेच कोरोनामुळे मूत्यूची आकडेवारी उत्तर प्रदेशात इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केले होते. त्यानंतर काही भाजपा नेत्यांकडून गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. तर उत्तर प्रदेश सरकारने त्यांना खोटी बातमी पसरवल्याची नोटीस दिली होती. तर २५ जून रोजी कानपूर शेल्टर होम प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली आहे. त्याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी, मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा अशा शब्दांत सुनावले आहे. जनतेची सेवक या नात्याने माझी लोकांशी बांधिलकी आहे. मी सरकारची स्तुती करायला बसलेले नाही. सरकारच्या विविध विभागातून मला धमकी मिळत आहे, पण यामध्ये सरकारने वेळ वाया घालवू नये. मी सत्य बोलतच राहीन. मी इतर विरोधी पक्षांप्रमाणे भाजपाची अघोषित प्रवक्ता नाहीये, अशा शब्दांत ट्विटरवरुन प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान दिले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराचकाळ संघर्ष चालला होता.

Protected Content