सरसंघचालक मिथून चक्रवर्तींना भेटले

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मिथुन चक्रवर्तीची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुंबईच्या मढ भागात मिथुनचा बंगला आहे. मोहन भागवत आज सकाळच्या सुमारास मिथुनच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते.

 

सरसंघचालक आणि मिथुनच्या भेटीला बंगाल विधानसभा निवडणुकीची किनार आहे. ८०-९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणाऱ्या मिथुनची लोकप्रियता आजही कायम आहे. मिथुन मूळचा बंगाली अभिनेता असून पश्चिम बंगालमध्येही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

 

मोहन भागवत यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना मिथुन म्हणाला की, “मोहन भागवतांबरोबर मी अध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना, मुंबईत आल्यानंतर एकदा माझ्या घरी भेट द्या, अशी विनंती केली होती.”

 

या भेटीनंतर मिथुन यांनी राजकीय पूर्नप्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाजपात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काहीही असे अंदाज लावू नका, तसे काही घडलेले नाही” असे मिथुनने सांगितले. मिथुनने यााधी नागपूरमध्ये आरएसएस प्रमुखांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरसंघचालकांना निमंत्रण दिले होते.

 

मिथुन चक्रवर्ती राज्यसभेत खासदार होते. बराच काळ पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये ते होते. २०१६ मध्ये प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला.

Protected Content