करण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कामांचे लोकार्पण

पारोळा प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यात विविध रस्ते, सुसज्ज स्मशान भूमी, राजीव गांधी नगरात महिला व पुरुष शौचालय, कुंभारवाडा, कासार गल्ली येथील प्रसाधनगृह, विद्यानगर, श्री नाथजी नगरात बगीचा विकसित करणे, डीडी नगरात सभागृह, अग्निशामक सेवा केंद्राच्या कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान व विविध बांधकामे, ऐतिहासिक विहीर नूतनीकरण आदींच समावेश होता. दिव्यांगाना निधी वाटप, घरकुलांचेे अर्थसहाय्य धनादेश वाटप, कोरोना योद्ध्यांचा सन्मान, रक्तदान शिबिरात सहभाग देणार्‍या दात्यांना २ लाखाचा विमा वाटप, हरित पट्टांतर्गत संपूर्ण शहरात वृक्षारोपण तसेच केमिस्ट व पत्रकार भुवनांचेही भूमिपूजन यांचा समावेश होता.

या कार्यक्रमांना खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी पारोळा शहराच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी जाहीर केला.

या कार्यक्रमांना नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक सुधाकर पाटील, मनिष पाटील, संजय पाटील, भाजप गटनेते बापू महाजन, संजय पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content