पैशांसाठी विवाहितेचा सासरी छळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निसर्ग कॉलनी येथील माहेर असलेल्या एका विवाहित महिलेला सासरी १ लाख रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपशील असा आहे की, निसर्ग कॉलनी येथील रोशनी राहूल वाघ यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर येथील राहूल भगवान वाघ यांच्याशी रीतिरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरच्या लोकांनी रोशनीकडे १ लाख रुपयांची मागणी केली. या रकमेसाठी तिला माहेरी जाऊन पैसे आणण्यास सांगण्यात आले. रोशनीने माहेरहून पैसे आणले नाहीत, यामुळे सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिच्या सासू, सासऱ्या आणि नणंदेनेही तिला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या छळाला कंटाळून रोशनी माहेरी निघून गेली आणि नंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पती राहूल भगवान वाघ, सासू मिनाक्षी भगवान वाघ, सासरे भगवान वामन वाघ आणि नणंद प्रियंका सुरेश बोरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोहेकॉ अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.