शीख दंगल प्रकरणात माजी खासदार सज्जन कुमार दोषी

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १९८४ च्या शीख विरोधी दंगलीदरम्यान झालेल्या हत्येशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील शिक्षेची घोषणा १८ फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे. ही घटना १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरातील आहे, जिथे जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. त्यांच्या भडकावणीवरूनच जमावाने दोन्ही शिखांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.

या हत्येचा गुन्हा पंजाबी बाग पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. मात्र, नंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास हाती घेतला. १६ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले होते. सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने सांगितले की जमावाने जसवंत सिंग यांच्या घरावर हल्ला करून त्यांची आणि त्यांच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर घर लुटून पेटवण्यात आले होते.

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले, “४० वर्षांनंतर शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यासाठी मी न्यायालयाचे आणि एसआयटी स्थापन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो.”

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले, “आज सज्जन कुमार यांना आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. काँग्रेसचे सर्व पाप उघड होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एसआयटी स्थापन करून या लोकांना तुरुंगात पाठवले. आज देवाने न्याय दिला.”

Protected Content