जळगाव येथे नैसर्गिक शेती तंत्राचे जनक पद्मश्री पाळेकर यांचे मार्गदर्शन

पाळेकर

जळगाव, प्रतिनिधी | केळी पिके खान्देशाचे वैभव असून केळीचे पिक भरघोस घेण्यासाठी शेतक-यांनी प्रयत्न केले पाहिजे. केळीच्या घडाचे वजन हे खोडाचा खालचा घेर, खोडाची उंची, पानाची संख्या व आकार, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यासह पानावर पडणारी सूर्यप्रकाशाची तीव्रता यावर अवलंबून असते अशी माहिती पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दिली.

नैसर्गिक शेती तंत्राचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर हे शेतक-यांना नैसर्गिक शेती करण्याचे शास्त्रोक्त धडे प्रत्यक्ष शेतात जाऊन देण्यासाठी जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांनी शनिवारी चोपडा तालुक्यातील विटनेर येथे शिवारफेरी (पिकपाहणी) हा कार्यक्रम घेतला. जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.गिरीश बोरसे उपस्थित होते.

जळगाव शहरात याआधी जुलै महिन्यात घेतलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत सुभाष पाळेकर यांनी केळी लागवड व इतर पिकांची नैसर्गिक शेती कशी करावी याबाबत माहिती दिली होती. आता सुभाष पाळेकर हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतक-यांना माहिती देत आहेत. शनिवारी त्यांनी दीपक कोळी यांचे शेतात वसई जातीच्या नैसर्गिक केळीचे प्रात्यक्षिक दाखविले. दुपारी श्रावण बाबा मंगल कार्यालय येथे सुभाष पाळेकर यांनी शेतक-यांशी चर्चा केली. केळी पिकाविषयी आलेल्या अडचणी, उत्पादन खर्च, लागवडीच्या टिप्स यावर त्यांनी प्रश्नोत्तरे माध्यमातून जाणून घेतले. नैसर्गिक शेती कशी करावी, त्यातील नियोजन, व्यवस्थापन कसे करतात याबाबत सविस्तर माहिती दिली. रासायनिक खते वापरून पिकविलेल्या केळी पिकांपैकी सुमारे ३० टक्के पिक हे विक्रेत्यांकडे जाईपर्यंत खराब होतात. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली केळी ग्राहकांपर्यंत जाताना एक टक्काही खराब होत नाही, असेही पाळेकर यांनी सांगितले. खान्देशातून आलेल्या केळी उत्पादकांनी यावेळी त्यांचे अनुभव कथन केले. सुमारे १५० शेतकऱ्यांनी उपस्थिती दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी दीपक कोळी, दीपक सोनार, दीपक पाटील, आशिष पाटील, योगेश लाठी, विश्वेश रावेरकर, नितीन समदाणी व गंगाधर राजपूत आदीनी परिश्रम घेतले.

उद्या भडगावमध्ये मार्गदर्शन

दि. ६ ऑक्टोबर रोजी दिवसभर भडगाव तालुक्यात गिरड रस्त्यावर असणा-या डॉ. गिरीश बोरसे आणि डॉ. रंजना बोरसे यांच्या शेतात नैसर्गिक लिंबूच्या ४ एकराच्या बागेत लिंबुची लागवड, सीताफळ, शेवगा, हादगा आणि इतर भाजीपाला यांची लागवड तसेच नैसर्गिक उस २ एकरमधील ८ फुट पट्ट्यात कसा घेतला जातो याचे प्रात्यक्षिक सुभाष पाळेकर दाखविणार आहेत. हळद, अद्रक, मिरची, मुंग, झेंडू, कापूस, मका याविषयीदेखील मार्गदर्शन करणार आहेत. शेतक-यांनी नोंदणी करण्यासाठी सुचेतन हॉस्पिटल, मोहिते बिल्डींगमागे, स्वातंत्र्यवीर चौक येथे किवा दीपक सोनार (९३७०५४४३०१), डॉ.गिरीश बोरसे (९८२३० २४६३६) यांचेकडे नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content