सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वढोदा प्र. सावदा येथील सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन आज महात्मा फुले जयंतीनिमित्त करण्यात आले.
शिक्षण हे परिवर्तनाचे साधन मानत, गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या या नव्या इमारतीचे भूमिपूजन सर्चलाईट संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांचे वडील भागवत तायडे आणि मातोश्री सुमन तायडे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन भंते दीपंकर यांच्या त्रिशरण पंचशीलने झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रावेर तालुका तहसीलदार बी.ए. कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील (सावदा), रामेश्वर मोताळे (फैजपूर), शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, तलाठी रशीद तडवी व निलेश पाटील, वढोदा ग्रामपंचायतचे सरपंच नंदकिशोर सोनवणे, सकाळचे प्रतिनिधी प्रवीण पाटील, तसेच हॉटेल महिंद्राचे संचालक राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार बी.ए. कापसे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज उत्थान करण्याचा दिलेला संदेश सांगितला. त्यांनी सर्चलाईट स्कूलकडून होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत उपयुक्त ठरेल व त्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक नितीन झाल्टे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅड. योगेश तायडे यांनी केले.
यावेळी रावेर तहसीलचे अधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सावदा नगरपालिकेचे माजी पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, पालक, विद्यार्थी व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी व उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.


