


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित २९ व्या गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भावगीतांचे सुरेल सादरीकरण केले. प्रौढ गटात नाजनीन शेख, किशोर गटात तनुष्का अनंत चौधरी तर बाल गटात देवांशी जितेंद्र चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्या पद्मजा नेवे, परीक्षक देवेंद्र देशमुख (अकोला) तसेच खिरोदा येथील श्रीमती कल्पना गावंडे यांच्या उपस्थितीत झाले. हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत बाल, किशोर आणि प्रौढ अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांनाही पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रौढ गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके अनुक्रमे २ हजार १, १ हजार ५०१ आणि १ हजार १ रुपये, किशोर गटासाठी १ हजार ५०१, १ हजार १ आणि ७०१ रुपये, तर बाल गटासाठी १ हजार १, ७०१ आणि ५०१ रुपये अशी होती.
बाल गटात देवांशी जितेंद्र चौधरी यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ हे गीत सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. भैरवी दीपक ठाकूर यांनी ‘फुलले रे क्षण माझे’ या गीतासाठी द्वितीय, तर कार्तिक संदीप ठाकूर यांनी ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतासाठी तृतीय क्रमांक मिळविला. चारुल राजेंद्र वाघ यांना ‘मी वाऱ्याच्या वेगाने’ या गीतासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. किशोर गटात तनुष्का अनंत चौधरी यांनी ‘मी फुले ही वेचतांना’ या गीतासाठी प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी सचिन देशपांडे यांनी ‘माझ्या सुरात माझा’ या गीतासाठी द्वितीय, तर दिव्या सुदाम शिवरामे यांनी ‘सर्वस्वी तुजला वाहुनी’ या गीतासाठी तृतीय क्रमांक मिळविला. स्वरा विनायक विलायते यांना ‘मी मज हरपुन बसले’ या गीतासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रौढ गटात नाजनीन शेख यांनी ‘जिवलगा राहिले रे दूर’ या गीतासाठी प्रथम क्रमांक मिळविला. प्रणव विनोद ईखे यांनी ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ या गीतासाठी द्वितीय, तर समीक्षा लक्ष्मीकांत माकोडे यांनी ‘रसिका मी कैसे गाऊ गीत’ या गीतासाठी तृतीय क्रमांक मिळविला. निकिता गणेश जोशी यांना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ या गीतासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
समारोपप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरसे, प्राचार्या पद्मजा नेवे, अॅड. डॉ. महिमा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला प्रा. सुशील महाजन व प्रा. प्रवीण महाजन यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. राजश्री पाठक यांनी केले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी संगीत ही केवळ कला नसून मनाला समृद्ध करणारी आणि समाजाला जोडणारी शक्ती असल्याचे सांगितले. भावगीतांच्या माध्यमातून मराठी संगीताची समृद्ध परंपरा आणि भावविश्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या स्पर्धेतून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. २९ वर्षांची सातत्यपूर्ण वाटचाल ही या उपक्रमाच्या सातत्याचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले.
परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांनी उत्तम तयारी करून भावगीतांचे सादरीकरण केल्याचे सांगितले. गीतातील भाव, शब्दोच्चार, स्वरांची अचूकता, ताल आणि सादरीकरण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केल्याचे त्यांनी नमूद केले. निकाल हा स्पर्धेचा एक भाग असून सातत्याने रियाज आणि कलेची साधना करणे हे कलाकारांच्या यशासाठी महत्त्वाचे असल्याचे परीक्षकांनी सांगितले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र व्यवस्थापक राजू पाटील, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. भूषण खैरनार, किशोर चौधरी, अनंता साठे, भूषण चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



