
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या अनुदानाचे वाटप तालुकास्तरावर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना ही मदत वेळेवर मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ई-केवायसी पोर्टल ५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाले आहे. ज्यांची ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रणालीवर नोंदणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्रा”मध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होऊ शकणार नाही, म्हणूनच प्रशासनाने या प्रक्रियेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित सेवा केंद्रावर जाऊन आपली ओळख आणि बँक खात्याची पडताळणी करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, “शासनाकडून मिळणारे अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे.”
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अनुदान वितरणात पारदर्शकता आणि वेग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



