शिवसेना खासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल; प्रकृती आणखी बिघडली


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना तातडीने भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः आजारी असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

राऊत यांना नियमित तपासणी आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बुधवारी (५ नोव्हेंबर) रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाकडून सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतर ते लवकरच भांडुप येथील त्यांच्या “मैत्री निवास” येथे विश्रांतीसाठी परततील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राऊत यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून अंतर ठेवले आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक पत्र जारी करून प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे – “माझ्या सर्व मित्रांना, कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती: जय महाराष्ट्र! तुम्ही नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि प्रेम केले आहे, परंतु मला अचानक गंभीर आजार झाला आहे. उपचार सुरू आहेत. मी लवकरच बरा होईन.”

त्यांच्या या निवेदनानंतर पक्षातील सहकारी आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या लवकर प्रकृती सुधारासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सध्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, काही काळ राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

संजय राऊत हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. ते राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाच्या राजकीय हालचालींमध्ये काही काळासाठी शांतता दिसून येत आहे.