
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या देश-राज्याच्या विकास प्रवासाची झलक जळगावमध्ये भरविण्यात आलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या भव्य प्रदर्शनात पाहायला मिळाली. खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. “या प्रदर्शनाद्वारे स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली आहेत,” असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी काढले.
शिवतीर्थ मैदानावर तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात मंत्री सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवीताई वाघ, गोदावरी शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा केतकीताई पाटील, माजी जि.प. सदस्य राकेश पाटील, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, अजित राणे, एलडीएम सुनील डोहरे, तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, विभागीय प्रमुख दत्ता थोरे, प्रोजेक्ट सहाय्यक दीपकसिंग मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “गेल्या तीन दिवसांत या प्रदर्शनात अधिकारी आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचा आदर्श उदाहरण तयार झाला. अधिकारी वर्गाने नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी माहिती दिली. हे प्रदर्शन म्हणजे विकासाची दिशा आणि जनसंपर्काचा संगम होता.”
या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशीही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुटीचा दिवस असूनही शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शाळा-काॅलेजचे विद्यार्थी, सरपंच आणि उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तीन दिवसांत तब्बल 12 हजारांहून अधिक जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देत ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ची झलक अनुभवली.
प्रदर्शनातील सर्वोत्तम शासकीय स्टॉल्सना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सशस्त्र दलांसाठी मुनिशन्स इंडिया लिमिटेड, डिजिटल इनोव्हेशनमध्ये गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये भारतीय रेल्वे, बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया, तर पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी फलोत्पादन आणि वृक्षारोपण कॉर्पोरेशन विभाग – तमिळनाडू या विभागांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शोधप्रकल्प स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांनी “ऑल इन वन रोबोटिक किट” या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावला. केसीई अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना “मशीन पॉवर्ड बाय सोलर एनर्जी”साठी द्वितीय क्रमांक, तर पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना “थ्रेट ऑफ ह्युमॅनिटी” प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले, सूत्रसंचालन सरिता खोचणे यांनी तर आभार प्रदर्शन दीपकसिंग मेहता यांनी केले.
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची सांगता उत्साहात झाली. या उपक्रमाने जळगावकरांना केंद्र-राज्य शासनाच्या विकास योजनांचा थेट अनुभव मिळवून दिला आणि नागरिक-प्रशासन यांच्यातील संवादाचे नवे दालन खुले केले.



