राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) अल्पसंख्यांक विभागाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी शेख कुर्बान यांची नियुक्ती 


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) अल्पसंख्यांक विभागात नवीन नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली असून, फैजपूर तालुक्यातील तहानगर येथील शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम यांची रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्रावर प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या स्वाक्षरीने आदेश क्रमांक जा.क्र. ९४६/२५ दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.

या नियुक्तीद्वारे शेख कुर्बान यांच्यावर पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्याची आणि रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे पक्षाची वैचारिक पायाभरणी आणि संघटनात्मक ताकद ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल, असा विश्वास प्रदेश नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुलभाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सैय्यद जलालुद्दीन तसेच ज्येष्ठ नेते मा. नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यकर्त्यांनी शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल शेख कुर्बान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरत, दिलेली जबाबदारी निष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. त्यांनी या नियुक्तीमुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांना नवा आत्मविश्वास लाभेल आणि पक्षाचा संदेश सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल, असेही स्पष्ट केले.

या नियुक्तीने रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)च्या संघटनात्मक कार्याला नवीन दिशा आणि गती मिळणार आहे.