सरकारचा जीआर अमान्य : मनोज जरांगे उपोषणावर ठाम

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने काढलेला जीआर अमान्य असून त्यांनी आपले उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारसोबतची ताजी बातचीत देखील असफल ठरल्याचे दिसून आले आहे. आज जरांगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना याचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यांनी आज मराठा समाजबांधवांवर लाठीमार करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा संताप व्यक्त केला.

 

या संदर्भात ते म्हणाले की, समाजातील महिला व पुरूषांवर ज्या अधिकार्‍यांनी गोळ्या फायर केल्या, ते मुंबईला शिष्टमंडळासोबत फिरत आहेत. ज्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे ते अधिकारी आपल्या समोर फिरत आहेत. सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. पण आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. भ्याड अमानुष हल्ला करणार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवत नसतात. त्यांना बडतर्फ करत असतात, असे जरांगे पाटील म्हणाले.

 

दरम्यान, राज्य सरकारने जीआर काढला असला तरी तो आपल्याला अमान्य आहे. जोवर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही, तोवर आपला लढा कायम राहणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. तर काल रात्री उशीरापर्यंत मुंबईत बैठक होऊन याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या सोबत चर्चा देखील करण्यात आली असली तरी त्यांनी आपला लढा मागे घेण्यास ठाम नकार दिल्याने सरकार समोरील पेच वाढल्याचे दिसून येत आहे.

Protected Content