पाचोरा-भडगावात शासकीय धान्य खरेदीस प्रारंभ: अमोल शिंदे यांचा पाठपुरावा

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यात शासकीय धान्य खरेदीस प्रारंभ करण्यात आला असून या संदर्भात भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

याबाबत वृत्त असे की, सुमारे दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी सहकारी संघामार्फत शेतकर्‍यांचे ज्वारी, मका व गहू खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून नोंदणी केली गेली होती. ज्वारी, मका व गहुसाठी पाचोरा – भडगाव तालुका मिळून ३ हजार ५०० शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. खरिपाचा हंगाम येऊन गेला परंतु शेतकरी बांधवाचा रब्बीचा शेतमाल घरात पडून होता. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे त्यांना जिकिरीचे झाले असतांना काही शेतकरी बांधवांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची भेट घेऊन ही समस्या मांडली.

यावर तात्काळ मार्ग निघावा यासाठी अमोल शिंदे यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दि. १० मे २०२१ रोजी भेट घेऊन पाचोरा – भडगाव सह जिल्ह्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच खा. उन्मेष पाटील यांनी देखील सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून यावर तात्काळ शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशा सूचना देखील केल्या होत्या.

दरम्यान, अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला प्रत्यक्षात यश आले आणि धान्य खरेदीचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले. परंतु आदेश प्राप्त होऊन देखील प्रत्यक्षात खरेदी करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने खरेदी होऊ शकत नव्हती. त्यामुळे तेवढ्यावर न थांबता अमोल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तो देखील विषय मार्गी लावला. यामुळे दि. २२ जून पासून शासकीय धान्य खरेदीला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Protected Content