जलवाहिनीच्या खड्डयांमुळे तुंबले पाणी

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांसाठी खोदलेल्या खड्डयांमध्ये आणि यामुळे बाजूच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वरणगावकरांची मोठी गैरसोय होत आहे.

याबाबत वृत्त असे की, नुकताच वरणगाव येथे मंजुर असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा आ.संजय सावकारे व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या हस्ते आणि माजी नगराध्यक्ष सुनील काळे व भाजपाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्या दिवशी पासुन पाण्याचे पाईप टाकण्यासाठी जे.सी.बी च्या सहाय्याने खड्डे खोदण्यात येवुन काही ठिकाणी पाईप सुद्धा टाकण्यात आले होते. परंतु आज झालेल्या पावसाने पाईपलाईन साठी खोदलेले खड्डे पाण्याने तुडुंब भरल्याने त्या खड्ड्यांचे गटारीत रुपांतर होऊन अपघात होत आहे व सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरलेली असल्याने नगरपरिषदेच्या नियोजनावर नागरीकांकडुन प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तसेच गेल्या दिड वर्षांपासुन रावजीबुवा परीसरातील भुमिगत गटारी व रस्त्या लगत असलेल्या पाईप लाईनला वारंवार गळती लागुन रोजचे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची व साचलेले पाणी पाईपलाईन मधुन लोकांच्या घरात जात असुन साथीचे रोग होत असल्याची तक्रार वारंवार रहीवाशांकडुन करण्यात येत होती. परंतु आश्‍वासना व्यतिरीक्त नागरीकांना काहिही लाभ होत नसल्याने व आता ही नविन समस्या उद्भवत असल्याने नागरीकांकडुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाचे याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करून वरणगावकरांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Protected Content