सरकार प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देणार : पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असतांना केंद्र सरकार प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्यास तयार असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक सरकार सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर प्रथमच लोकसभेत कृषी कायदे निरसन विधेयक २०२१ सादर करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला.

संसदेच्या आवारात माध्यमांशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे. ते म्हणाले, हे संसदेचे महत्वपूर्ण अधिवेशन आहे, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अधिवेशनात संसद देशाच्या हितासाठी चर्चा करेल, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग शोधेल, दूरगामी प्रभाव टाकणारे परिणामकारक निर्णय घेईल. अधिवेशनादरम्यान किती गोंधळ झाला, किती तास वाया गेले हा मापदंड मानण्यापेक्षा किती काम झालं, सकारात्मक काम किती झालं हा असायला हवा. सरकार प्रत्येक विषयावर खुली चर्चा करण्यास तयार आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. मात्र हे प्रश्न शांतता राखून विचारायला हवेत. सरकारच्या धोरणांबाबत कितीही प्रखर विरोध असला तरी संसदेची प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे. संसदेत असं आचरण असायला हवं की ते देशाच्या तरुण पिढीसाठी आदर्श ठरेल.

Protected Content