जयपूर वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणार्या राजस्थानातील सत्ता संघर्षात काँग्रेसला यश लाभले असून विधानसभेचे अधिवेशन घेण्याला राज्यपालांनी अखेर मान्यता दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात मोठे नाट्य सुरू आहे. गेहलोत सरकारमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काही आमदारांना सोबत घेत बंडाचा पवित्रा घेतल्याने खळबळ उडाली. पायलट विरूद्ध गेहलोत असा संघर्ष सुरू असताना राज्यपाल कलराज मिश्र यांनी अधिवेशन बोलावण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हा संघर्ष राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा सुरू झाला. मागील तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसनं सर्व राज्यातील राजभवनासमोर निदर्शनं केली होती. त्याचबरोबर गेहलोत सरकारनं राज्यपालांना अधिवेशन बोलावण्यासंदर्भात सुधारित प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यात काही उणीवा दाखवत राज्यपालांनी हा प्रस्तावही परत पाठवला.
या घडामोडी घडल्यानंतर मात्र राज्यपालांनी अधिवेशन घेण्याची मागणी मान्य केली आहे. आज दुपारी राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारला अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले. यामुळे यात काँग्रेसच्या संघर्षाचा विजय झाल्याचे मानले जात आहे. विशेष करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणी घेतलेली कणखर भूमिका निर्णायक ठरल्याचे दिसून आले आहे.