पाचोरा प्रतिनिधी । शेती व्यवसायात अनेक वेळा विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीसह वेगवेगळ्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ लागू करण्यात आली होती. परंतू या योजनेत वारसांना लाभ मिळत नव्हते. या विरुद्ध आ.किशोर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात उठवलेल्या आवाजाला यश मिळाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसालाही आता लाभ मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्या अनुषंगाने दि.३१ ऑगस्ट रोजी शासनाने या विमा योजनेच्या निकषात काही बदल करत नवीन शासन निर्णय घेतला असून यात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विमाछत्राखाली आणले आहे. त्याचा लाभ राज्यातील १० ते ७५ वयोगटातील १ कोटी ३७ लाख विहितीधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. आ.किशोर पाटील यांच्या मागणीला यश आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
शासनाने ३१ ऑगस्ट रोजी सुधारित शासन निर्णय काढत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत विहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश केला. यामुळे विहिती खातेधारक शेतकरी व विहिती खातेदारक म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती यात आई, वडील, पती, पत्नी, मुलगा अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ती ज्यांचे वय १० ते ७५ वर्षे आहे. अश्या एकूण २ जणांकरिता अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यास २ लाख रुपये इतके विमा संरक्षण देण्यात येते. राज्यातील कृषी गणनेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता शासनातर्फे विमा कंपनीस भरला जाईल. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झाल्यास कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास आणि त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली होती. मात्र या योजनेअंतर्गत फक्त विहित शेतकऱ्यासच फक्त त्याचा लाभ मिळत होता. आणि कुटुंब मात्र लाभापासून वंचित राहत होते. अशा शेतकरी कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळावा, या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने विधानसभेत प्रश्न मांडत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देखील ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा’ योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणीचा जोर धरला होता. त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.