भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनने भुसावळ बसस्थानकाचे सुशोभीकरण केले असून, ३० जून रोजीपासून प्रवासी आणि रुग्णांसाठी २४ तास रुग्णसेवा कक्ष आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सुरू करण्यात आली आहे. एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. जगनोर यांनी हा उपक्रम महामंडळाच्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांना विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होतील, याबद्दल त्यांनी गोदावरी फाउंडेशनचे आभार मानले.
गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांनी या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. तसेच, हा उपक्रम लवकरच जळगाव बसस्थानकावर देखील सुरू करण्यात येणार असून, त्याचे लोकार्पण ९ ऑगस्ट रोजी केले जाईल, अशी माहितीही त्यांनी आवर्जून दिली. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर लगेचच रुग्ण तपासणीला सुरुवात झाली. पहिल्या तासाभरातच सुमारे १५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास भुसावळ बस कंट्रोलर श्री. शिवदे, सन ॲडव्हर्टाईजचे मंगेश जुनागडे, गोदावरी आय.एम.आर.चे संचालक डॉ. प्रशांत वारके, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. एन. एस. आरवीकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. बडगुजर, नर्सिंग कॉलेजचे इन्चार्ज आकाश धनगर, इंटेरियरचे श्री. रामपाल जांगिड तसेच गोदावरी फाउंडेशनचे प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. पंकज बोंडे, रितेश व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.