जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली असून, ही कामगिरी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे साकारण्यात आली आहे. या यशस्वी उपचारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समोर आले आहे.
रावेर तालुक्यातील या महिलेची प्रकृती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना आवश्यक असलेली दक्षता, सुरक्षितता आणि खर्च या तिन्ही गोष्टींचा मोठा अडथळा निर्माण होत असतो. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा शस्त्रक्रियेसाठी ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, जो या महिलेच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हता. मात्र, गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात आली.

ही शस्त्रक्रिया ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या कुशल टीमने यशस्वीरित्या पार पाडली. त्यांनी सर्व आवश्यक वैद्यकीय प्रोटोकॉल आणि सुरक्षिततेचे नियम पाळत अत्यंत दक्षतेने ही सर्जरी केली. एचआयव्ही बाधित रुग्णांबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती यावर या घटनेने सकारात्मक प्रकाश टाकला आहे.
मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका या उपक्रमांतर्गत सध्या गोदावरी फाउंडेशनमार्फत मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे. या शिबिरामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, आरोग्यसेवेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. या उपक्रमातून अनेक रुग्णांना नवदृष्टी मिळत असून, ही मोहीम सामाजिक आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे.
या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसके, डॉ. गौरव पाटील, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. कीर्ती महाजन तसेच संजय महाजन, सबा, तृप्ती, प्रतीक्षा आणि स्वाती या स्टाफ सदस्यांनी मोलाची मदत केली. त्यांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
डॉ. नितु पाटील यांनी सांगितले की, संबंधित महिला मोफत मोतीबिंदू शिबिरातून तपासणीसाठी आली होती. तपासणीत ती एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असले तरी त्या महिलेची दृष्टी परत मिळवण्यासाठी ही जोखीम पत्करणे आवश्यक होते. तिची आर्थिक अडचण लक्षात घेता खाजगी उपचार शक्य नव्हते, त्यामुळे सामाजिक भान जपत नेत्रालयाने ही शस्त्रक्रिया निशुल्क केली.
मा. खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी” हे ध्येय समोर ठेवून मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका हा उपक्रम राबवण्यात येत आहे. समाजातील गरीब आणि वंचित घटकांनाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एचआयव्ही बाधित महिलेवर झालेली यशस्वी शस्त्रक्रिया ही या शिबिराची खरी फलश्रुती आहे.



