तोंडापूर येथील महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील आदीवासी महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करून कडक शिक्षा करावी या मागणीसाठी विविध शिष्टमंडळाच्या वतीने मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे एका अल्पसंख्याक आदिवासी महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात साध्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून अत्याचाराचे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात यावा, या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा, संशयित आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, पिडीत महिलेला अर्थसहाय्यक मदत द्यावी, १५ दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, हा खटला जलद न्यायालयात चालविण्यात येवून संशयित आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागण्या ३ दिवसात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून दिला आहे.

याप्रसंगी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख, तडवी महिला मंडळाच्या अध्यक्षा रफिया तडवी, उपाध्यक्ष छाया तडवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नसरून सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, रिटायर डेप्युटी कमिशनर जीएसटी एन.ए. तडवी, बाबू तडवी, कॉग्रेसचे अमजद पठाण, अनवर खान, नजमा शेख, आलिशान बशारत, अरुणा खुदा बक्श तडवी, हमीदा बाबू, चारुलता सोनवणे, मंजुबाई तडवी यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.

Protected Content