धानवड येथे शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

dead ..........

जळगाव प्रतिनिधी । शेतात रासायनिक खताची गोनी उचलून घेऊन जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने उत्तम हरी शिंदे (३८) रा. धानवड (जळगाव) यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर यांना जळगाव, औरंगाबाद तसेच मुंबई येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. शनिवारी त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. कुटुंबियांना ही वार्ता कळाल्यानंतर जबर धक्का बसला.

उत्तम शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे. दरम्यान ऑगस्टमहिन्यात ते पिकांना देण्यासाठी रासायनिक खताची गोनी उचलून शेतात नेत असताना त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांना दुखापत झाली होती. प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ जळगाव येथे सरकारी तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिकच्या उपचारार्थ त्यांना औरंगाबाद तसेच मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ते धानवड येथे घरीच औषधी घेत होते. आज दुपारी त्यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली. त्यानंतर कुटुंबियांसह नातेवाईकांनी त्यांना बारा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. उत्तम शिंदे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content