जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | आमदार गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरून प्रवीण चव्हाण हे प्रयत्न करत असल्याचा आरोप तेजस मोरेने केल्याने खळबळ उडाली असतांना खुद्द आमदार महाजन यांनी तब्बल पाच महिन्यांपूर्वीच आपल्यावर ‘मोक्का’ लावण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी बोलतांना केला होता. यामुळे हे नाट्य गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले असून यामुळे राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले गेले आहे.
सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला व्हिडीओ बॉंब आणि यावरील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या सांगण्यावरून आमदार गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी खोट्या केसेस दाखल करण्यासाठी कारस्थान रचत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप प्रवीण चव्हाण यांनी साफ नाकारले असून संबंधीत व्हिडीओ हे छेडछाड केलेले असल्याचा प्रत्यारोप केला. यानंतर या प्रकरणात एंट्री झालेल्या तेजस मोरे याने एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरूनच गिरीश महाजन यांना फसविण्याचे प्रयत्न सुरू होते अशी माहिती दिल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
( खाली बघा आमदार गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ )
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/389840612817940
दरम्यान, खुद्द आमदार गिरीश महाजन यांनी आपल्यावर मोक्का लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा सुतोवाच आधीच केले होते. दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी आपल्याला मोक्कामध्ये अडकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असून यात विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आपण सोबत पाहू शकतात. यात आपण ११ वाजून ३० सेकंदाच्या पुढे आमदार गिरीश महाजन हे कारस्थानाबाबत बोलत असल्याचे ऐकू शकतात.
दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांना जर पाच महिन्यांआधीच या प्रकारच्या कारस्थानाची कुणकुण लागली होती, तर प्रवीण चव्हाण यांचे स्टींग तेव्हापासून वा त्या आधीपासून देखील सुरू होते का ? याबाबत आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तसे असेल तर प्रवीण चव्हाण यांना अक्षरश: अंधारात ठेवून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर सर्व्हायलन्स सुरू असल्याच्या बाबीला पुष्टी मिळू शकते.
तर, फडणवीस यांनी विधानसभेत बोलतांना एकनाथराव खडसे यांच्या नावाचा उल्लेख केला असला तरी आज तेजस मोरे याने थेट खडसेंच्या सांगण्यावरूनच हा प्रकार सुरू होत असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळ हादरले आहे.