मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोमवारची ईद-ए-मिलादची शासकीय सुटी रद्द करून बुधवार, १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. ईद मिलाद मुस्लिम धर्मीयांचा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुटी सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आली होती. मात्र आता या सुटीत बदल करण्यात आला आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मीयांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
मंगळवार, दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुटी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुटी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश शासनाने काढला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईद-ए-मिलाद-उन-नबी हा दिवस मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. इस्लाममध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव जुलुस या कार्यक्रमाचे आयोजन करतात.