मुक्ताईनगर-पंकज कपले | आमदार एकनाथराव खडसे यांनी काल मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दावांना साफ फेटाळून लावत आपण फडणवीस यांच्यासोबत मिटवून टाकण्याची भाषा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर आपण फडणवीस आणि शाह यांना भेटणार असल्यावर मात्र ते ठाम आहेत.
काल चाळीसगाव येथे पत्रकारांशी बोलतांना राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला होता. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना तीन तास बसवून ठेवत अमित शाह यांनी भेट नाकारली होती असे ते म्हणाले. तसेच नाशिक येथे देवेंद्र फडणवीस व माझ्यासमोर खडसे यांनी एकदा आपण बसून आपल्यातील वाद मिटून टाकू असे वक्तव्य केल्याचा गौप्यस्फोट देखील केला होता. तर खडसे यांनी आता श्रध्दा व सबुरी हा मंत्र घ्यावा असा खोचक सल्लादेखील दिला होता.
आज एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरात बोलतांना गिरीश महाजन यांचे दावे फेटाळून लावत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाथाभाऊ म्हणाले की, रक्षाताईंनी गिरीश महाजन यांना अमित शाहा यांच्या भेटीबाबत काहीही माहिती दिली नाही. आपण शाहांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी गेलो होते. तथापि, भेट न झाल्याने आपण फोनवरून चर्चा केली होती. याची माहिती शरद पवार यांना देखील होती असे आपण आधीच सांगितले आहे. यामुळे आता याबाबत गिरीश महाजन यांचा दावा खोटा असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, नाशिक येथे महानुभाव समाजाच्या कार्यक्रमात आपण फडणवीस यांच्याशी बोलतांना लवकरच भेटू असे सांगितले होते. यावर फडणवीस यांनी होकार दिला होता. तथापि, यानंतर फडणवीस हे विदेशात गेले. नंतर आता नवरात्र सुरू झाली. यामुळे ही भेट राहिली आहे. तथापि, आपण शरद पवार साहेबांसोबत अमित शाह यांना तर नंतर देवेंद्र फडणवीस यांना नक्की भेटणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आता तडजोड करण्याचे मार्ग नसल्याचेही खडसे म्हणाले. माझ्या मागे ईडीसह सर्व चौकशा असल्याने आता कशाचा वाद मिटवणार ? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला.
गिरीश महाजन यांनीच श्रध्दा आणि सबुरी हा मंत्र लक्षात ठेवावा. कारण पुढील मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर सत्ताधार्यांमध्ये काय होईल ते दिसेलच असा टोला देखील खडसे यांनी मारला. तसेच, महाजन हे लहान असल्यापासून आपण त्यांची काळजी घेत आहोत. त्यांनी माझी काळजी करण्याचे काही एक कारण नसल्याचेही त्यांनी ठणकावले.
खालील व्हिडीओत पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/463075005787168