गिरीशभाऊच ‘गारूडी नंबर वन’ !

चाळीसगाव मुराद पटेल । ऐन वेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भूमिका सर्वात महत्वाची राहिली असून यातून एकाच दगडात त्यांनी अनेक पक्षी मारले आहेत. यातून गिरीशभाऊंनी जिल्हा भाजपमध्ये आपलाच शब्द चालत असल्याचेही सप्रमाण सिध्द केले आहे.

भाजपमध्ये वर्चस्व

एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा भाजपवर मिळवलेले वर्चस्व कुणापासून लपून राहिलेले नाही. यानंतर झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ना. महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार आगेकूच केली. तर विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आपले समर्थक चंदूलाल पटेल यांना एकतर्फी निवडून आणले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गत वर्षाच्या अखेरीस झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे शिल्पकारही तेच ठरले. एकीकडे जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये आपल्या वर्चस्वाची द्वाही फिरवत असतांना दुसरीकडे राज्यच नव्हे तर थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची चमक दाखविण्यातही ना. गिरीश महाजन मागे राहिले नाहीत. विशेष करून राज्यातील अनेक महत्वाच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. महत्वाच्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपचे संकटमोचक मंत्री म्हणून ते ख्यात झाले. या पार्श्‍वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातच ना. महाजन यांना जळगावच्या जागेवरील उमेदवारीवरून जोरदार फटका बसल्याने त्यांना भाजपमध्ये डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात यामुळे सजग झालेल्या गिरीशभाऊंनी आपली यंत्रणा कामाला लावल्याचे अधोरेखीत जाले.

पडद्याआड फिरविली सूत्रे

खरं तर, खासदार ए.टी. पाटील यांची कथित आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले. यातच नामदार महाजन यांच्याकडून अभियंता प्रकाश पाटील, आमदार उन्मेष पाटील व पारोळ्याचे आमदार करण पवार यांची नावे पुढे करण्यात आली. ते विशेष करून प्रकाश पाटील यांच्यासाठी अडून बसले होते. मात्र भाजपने आश्‍चर्यकारक पध्दतीत आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने महाजन यांना धक्का बसला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विशेष करून संघाच्या मर्जीने स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. आपल्याच जिल्ह्यात आपल्याला डावलण्यात आल्याचे पाहून महाजन यांनी चक्रे फिरवण्यास सुरवात केल्याचे काही दिवसांपासूनच लक्षात आले होते. गत काही दिवसांमध्ये घडलेल्या या घटनांवर आता उन्मेषदादा पाटील यांच्या उमेदवारीने शिक्कामोर्तब झाले आहे.

एकाच दगडात अनेक शिकारी

आमदार स्मिता वाघ यांचा लोकसभा निवडणुकीतील पत्ता कापून नामदार गिरीश महाजन यांनी एकाच दगडात अनेक शिकार केल्या आहेत. एक तर खासदार ए.टी. पाटील यांनी आधीच वाघ कुटुंब सोडून कुणालाही उमेदवारी दिल्यास आपली हरकत नसल्याचे जाहीर केले आहे. यातच उन्मेष पाटील व खासदार ए.टी. नाना यांच्यातील सलोखा जगजाहीर असल्यामुळे ते उन्मेषदादांना विरोध करणार नसल्याचे मानले जात आहे. तर उमेदवार बदलल्यामुळे अमळनेरचे भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी हेदेखील आपले बंडाचे निशाण म्यान करणार असल्याची बाब उघड आहे. ते स्वत: आज उन्मेषदादांची उमेदवारी दाखल करतांना उपस्थित होते ही बाब विशेष होय. उदय वाघ यांच्याबाबत शिवसैनिकांची कटुतादेखील कमी होणार असल्याचे गणित मांडण्यात येत आहे. याची चुणूक आज दिसून आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या माध्यमातून ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा भाजपमध्ये आपल्याला डावलल्याची परतफेड काही दिवसांमध्येच करून पक्षांतर्गत स्पर्धक व विरोधकांचा योग्य तो संदेश दिला आहे. अर्थात, जिल्हा भाजपमध्ये आता गिरीशभाऊंचाच शब्द अंतिम राहणार असल्याचेही ठळकपणे अधोरेखीत झाले आहे.

नाना प्रचारात फिरणार का ?

दरम्यान, आमदार उन्मेष पाटील यांना मिळालेल्या तिकिटामध्ये खासदार ए.टी. पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील आपले उपद्रवमूल्य सिध्द केले आहे. या दोन्ही मान्यवरांची नाराजी आमदार स्मिता वाघ यांना अडचणीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच उन्मेष पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्याची बाब स्पष्ट आहे. स्वत: उन्मेषदादा व ए. टी. नाना यांच्यातील सलोखा आजवर सर्वश्रुत होता. यातच नानांनी वाघांविरूध्द दंड थोपटून उन्मेष पाटलांचा मार्ग मोकळा केला. यामुळे नाना हे आमदार पाटलांच्या प्रचारात सहभागी होणार का ? या बाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये गिरीशभाऊ हे राजकीय रिंगणातील अगदी पारंगत गारूडी असल्याचे सिध्द झाले आहे.

Add Comment

Protected Content