जळगाव (प्रतिनिधी) ।एकलव्य क्रीडा संकुल व एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ मार्च २०१९ रोजी एकलव्य क्रीडा संकुलातील विविध खेळांचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडू, पालक व मार्गदर्शक यांच्यासाठी स्पोर्ट्स स्पेसिफिक लेक्चर्स या उपक्रमाअंतर्गत उन्हाळ्यामध्ये खेळाडूंनी घ्यावयाची काळजी, त्यांचा आहार व प्रशिक्षण या विषयाला अनुसरून “गेटिंग फिट फॉर समर”या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर व प्रमुख वक्ते प्रा. निलेश जोशी उपस्थित होते. प्राचार्यानी आपल्या भाषणात जीवनातील खेळाचे महत्व सांगितले तर डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी खेळाडूंसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. या सेमिनारसाठी जलतरण, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, क्रिकेट, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, फुटबॉल अशा विविध खेळांचे ६० खेळाडू, १४० पालक व ३० मार्गदर्शक असे एकूण २३० प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. निलेश जोशी यांनी या उपक्रमामागची शास्त्रोक्त भूमिका अधोरेखित करतांना उन्हाळा, खेळ, आहार व प्रशिक्षण यांची सुरेख सांगड घालत दैनंदिन जीवनात उपयोजू शकणाऱ्या बारीक बारीक मुद्यांसह उपस्थितांना बोलके करत पाण्याचे जीवनातील महत्व विषद केले. टीव्ही वा इतर प्रसारमाध्यमांद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या विविध जाहिरातींचे अंधानुकरण न करता, खेळ व परिस्थितीनुसार हायड्रेशन ड्रिंक्सचा वापर कसा करता येईल हे देखील सांगितले. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या पर्यायांचे महत्व पटवून देतांना Eat Your Water हि संकल्पना मांडली. त्यांनी उपस्थितांना Eat Smarter + Train Harder = Perform Better हा मूलमंत्र दिला.
शेवटी त्यांनी खेळाडूचे अपेक्षित कार्यमान साधण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा पोषण, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा प्रशिक्षण, मापन व मूल्यमापन अशा विविध पैलूंचा उहापोह केला. तसेच येणाऱ्या वर्षात या सर्व बाबींवर काम करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमारजी बेंडाळे यांच्या संकल्पनेवर आधारित एकलव्य स्पोर्ट्स सोल्युशन्स या शास्त्रोक्त शाखेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.