कुसुंब्यात डबल मर्डर: दाम्पत्याचा खून; परिसरात खळबळ

जळगाव प्रतिनिधी । शहराला लागून असणार्‍या कुसुंबा गावानजीकच्या परिसरातील रहिवासी असणार्‍या दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, कुसुंबा शिवारातील कॉलनी परिसरात रहिवासी असणारे मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची सौभाग्यवती आशा मुरलीधर पाटील या प्रौढवयीन दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास आढळून आले. यापैकी आशा मुरलीधर पाटील (वय ४७) यांचा मृतदेह तळ मजल्यावरील मागच्या रूममध्ये आढळून आला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर राजाराम पाटील (वय५४) यांचा मृतदेह हा वरील मजल्यावरच्या रूममध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही पती-पत्नीच्या गळ्याला फास दिल्याचे व्रण आणि मारहाण केल्याचा खूणा दिसून आल्या यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला की, कुणी चोरीच्या उद्देश्याने घरात येऊन त्यांचा झटापटीत खून केला याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील घटनास्थळी दाखल झाले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.