ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांना २१० कोटीचा निधी वितरित – मंत्री अनिल पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात २१० कोटी  ३०  लाखांचा मदत निधी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला.  संगणकीय प्रणालीवर कळ दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत निधी वितरण करण्याची प्रक्रिया आज मंत्रालय मुंबई येथे पार पडली.

मागील पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५०० कोटी इतका निधी बाधित शेतकऱ्यांकरिता मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरु आहे. आज  मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या निधी वितरणाबाबत आढावा घेतला.

उद्यापर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवार पर्यंत आणखी २ लाख ५० शेतकऱ्यांकरिता १७८ कोटी २५ लाख इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी करण्याचे श्री.पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ही सेवा निशुल्क असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. तसेच डिबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यां प्रती सजग असून शेतकऱ्यांकरिता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ई केवायसी  करून घेण्याच्या सूचना देखील सर्व तहसील व जिल्हा यंत्रणांना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.

Protected Content