वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यात खेडी बुद्रुक येथे अद्ययावत वारकरी भवन उभारण्यास जिल्हा नियोजनमधून ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जागा ही प्राप्त झाली आहे. अद्यावत सोयी-सुविधांयुक्त वारकरी भवन निर्मितीच्या कामांना गती देण्यात यावी. असा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात वारकरी भवन निर्माणाच्या तयारी बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.पी.सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने वारकरी भवनाचा प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना दिल्या की, वारकरी भवन वास्तूचा आराखडा, रेखांकन अंतिम करण्याचे काम तत्परतेने करण्यात यावे. वास्तुविशारद व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे पुढील प्रशासकीय बाबींचे नियोजन करून वारकरी भवनाचे बांधकाम व त्यातील फर्निचर, विद्युत संयोजना ची व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या करणे उचित राहील.

कमीत कमी खर्चात उच्च गुणवत्तेची सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या दिवशीच पाच तासांच्या आत वारकरी भवन साठी खेडी येथे जागेचा शोध घेऊन सातबारा ही तयार करण्यात आला. याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक केले.

Protected Content