बनावट इच्छापत्रप्रकरणी चौघांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून त्यावर मयतची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याप्रकरणी जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतिलाल ललवाणी (रा.जयनगर) व अजय शांतिलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) अशा चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.  याप्रकरणातील चौघांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

याबाबत आर्किटेक्ट दिलीप आनंदा कोल्हे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.  जळगावच्या मौजे मेहरूण शिवारात (गट क्रमांक ४६४/१) मध्ये फिर्यादीसह राजेश ललवाणी, (कै.) मुकेश शांतिलाल ललवाणी (दोघे रा. जयनगर) व श्रीराम गोपालदास खटोड अशा चौघांनी मिळून १३ नोव्हेंबर २००१ रोजी अदलाबदल खत दस्त क्र. ६३५१ नोंदणीकृत दस्तान्वये घेतली आहे. यापैकी मुकेश ललवाणी हे ५ ऑक्टोबर २०२० रोजी मयत झाले आहेत. दिलीप कोल्हे यांना मुकेश ललवाणी यांचे इच्छापत्र १५ जून २०२१ रोजी मिळाले. इच्छापत्रातील जयेश ललवाणी व रोहन ललवाणी यांनी त्या मिळकतीची विभागणी केली.

त्या मिळकतीवर साक्षीदार म्हणून राजेश ललवाणी व अजय ललवाणी यांच्या सह्या आहेत. आर्किटेक्ट दिलीप कोल्हे यांनी कागदपत्रांची तीन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्या तपासणीत सही व अंगठा खोटा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. इच्छापत्राच्या आधारे संबंधित तलाठी यांनी मयत मुकेश यांचे वारस म्हणून जयेश व रोहन ललवाणी यांच्या नावाची नोंद उताऱ्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर चौघांनी जळगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवार १० जानेवारी रोजी जानेवारी सुनावणी होऊन न्या. एस. एन राजूरकर यांनी जामीन अर्ज फेटाळला सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली.

Protected Content