जिल्ह्यात चार नवीन एस. टी. आगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील ! : पालकमंत्री

जळगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते राज्य परिवहन मंडख व परिवहन खात्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत बोलत होते.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी घेण्यात आल्या. यातील पहिली बैठक ही राज्य परिवहन मंडळ अर्थात एस.टी. खात्याची झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही, शाम लोही, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता निलेश पाटील, सहायक प्रादेशीक परिवहन अधिकारी (एआरटीओ ) हेमंत सोनवणे, मोटार वाहतूक निरिक्षक सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदींचा समावेश होता. या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य परिवहन खात्याची माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी काही महत्वाचे निर्देश दिलेत.

यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्यात एस.टी.चे एक आगार अपेक्षित असतांना जिल्ह्यात फक्त ११ आगार असून धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एस.टी. डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली. यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देश दिले. यासोबत आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पासेससाठी अडचणी होऊ नयेत म्हणून याचे कार्यालय हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत उघडे रहावे असे ते म्हणाले. तर मोठ्या गावांमध्ये पासेस मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. तसेच नवीन बसेसची मागणी, बस स्थानकांचे नूतनीकरण, डागडुजी आदींचे प्रस्ताव पाठविण्याचे देखील सुचविले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते श्याम लोही व जगनोर यांचा सत्कार

या बैठकीच्या प्रारंभी जिल्हा एस.टी. खात्याने राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा तर, महसुलात उत्तम कामगिरी करण्यासह जिल्ह्यातील अपघातांमध्ये ४० टक्के इतकी घट आल्याबद्दल एआरटीओ शाम लोही यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यंदा जानेवारी ते मे दरम्यान अपघातांची संख्या कमी झाल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी परिवहन खात्याच्या गत पाच वर्षातील महसुलाबाबत आढावा घेतला. आरटीओ विभाग-महसूल वसुलीबाबत माहिती घेतली. यात मागील चार वर्षांमध्ये जळगावच्या आरटीओ विभागाला ५७९ कोटी ४४ लक्ष रूपयांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ५२६ कोटी ९२ लक्ष रूपये म्हणजेच सुमारे ९१ टक्के महसूल वसूल झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात २०५ कोटी ९६ लक्ष उद्दीष्ट असतांना यातील २३ कोटी ८३ लक्ष वसुली करण्यात आली असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तर कर्की येथील सीमा तपासणी नाका येथे चार वर्षात २९ कोटी ६३ लक्ष उद्दीष्ट असतांना फक्त १४ कोटी ३४ लक्ष वसुली झाली. तर, चोरवड येथील सीमा तपासणी नाक्यावर चार वर्षात ५ कोटी १० लक्ष रूपयांचे उद्दीष्ट असतांना २ कोटी ३९ लक्ष वसुली करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारे अपघात हा चिंतेचा विषय असल्याने याबाबत चर्चा करण्यात आली. यात सर्व तालुक्यांमध्ये वारंवार अपघात होणार्‍या ७० ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून अपघातांची संख्या कमी कशी करता येईल ? यावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन वर्षांपेक्षा यंदा अपघातांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी परिवहन खात्याला आवश्यक ते निर्देश दिलेत. यात प्रामुख्याने जळगाव येथील उपप्रादेशीक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवून तो प्रादेशीक परिवहन अधिकारी असा करावा तसेच भडगाव येथे उपप्रादेशीक परिवहन कार्यालय उभारावे यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असून यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावेत असे निर्देश ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. परिवहन विभागाच्या नवीन आकृतीबंधातील रिक्त पदांची माहिती देखील सादर करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अंमली पदार्थांची वाहतूक करणार्‍यांना आळा घालावा, केळी वाहतूक करणार्‍या वाहनांना तपासणी नाक्यावर अडवू नये, अपघातांना आळा बसून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

Protected Content

%d bloggers like this: