जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर एक मोठी उलथापालथ घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे माजी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित मनोहर पाटील आणि रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला, विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असून, आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने जामनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.
या पक्षप्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. चंद्रकांत काते, जिल्हाप्रमुख प्रा. समाधान महाजन आणि जामनेर तालुका प्रमुख ॲड. भरत पवार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. मनोहर पाटील हे जामनेर मतदारसंघात १९९० पासून सातत्याने अत्यंत कमी मतांच्या फरकाने संघर्ष करणारा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विश्वजित पाटील यांनी सामाजिक कार्याला राजकारणाची जोड दिली. आपल्या ओघवत्या वक्तृत्वाच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती. त्यांनी आपल्या नेतृत्वात जिल्ह्यात तरुणांची मोठी फळी तयार केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव कोणावरही टीका-टिप्पणी न करता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

विश्वजित पाटील यांच्या या पक्षप्रवेशाने जामनेरमधील महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारीच नव्हे, तर ठाकरे गटाचे (उबाठा) स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध ग्रामपंचायतींचे सदस्य अशा प्रतिष्ठित चेहऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये युवासेना-उबाठा तालुका युवा अधिकारी मयुर पाटील,सामाजिक न्याय विभाग, रा.कॉं.पा.-श.प.जामनेर ता.कार्याध्यक्ष अरुण सावकारे ,प्रविण कुमावत),विक्रम घोंगडे, ,कृष्णा चोरमारे, विलास मांडे(,ईश्वर पाटील, ,राजेश चव्हाण, मोहन जोशी ,कार्तिक काळे, राहुल चौधरी ,सचिन शहाणे ,हरिसिंग सिसोदिया, रविंद्र पाटील,भुषण चौधरी, सुनिल पाटील,राहुल पाटील,अरुण कोळी,पवन पाटील,गणेश पाटील ,मुकेश जाधव,चंद्रकांत पाटील, अभिजीत शेळके, ,पवन पाटील,नारायण इधाटे, अक्षय सोनार, ,रोशन धनगर यांच्यासह युवक काँग्रेस आणि इतर संघटनांमधील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे जामनेर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट झाली असून, स्थानिक पातळीवर पक्षाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष बदलल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या राजकीय संघर्षात कोण बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



